Ad will apear here
Next
‘कटप्पा’ने माफी का मागितली?
सत्यराजदीडेक वर्षापूर्वी ‘बाहुबली’ चित्रपटाने गल्लापेटीवर तुफान माजवले होते. त्यानंतर ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले,’ या प्रश्नाने नेटकरी मंडळींना छळले होते. त्या प्रश्नाचे उत्तर ज्या दुसऱ्या भागात मिळणार होते, तो भाग प्रदर्शित होण्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला. या वादाची परिणती एका माफीनाम्यात झाली आणि पहिल्या प्रश्नाएवढाच टोकदार प्रश्न निर्माण झाला – ‘कटप्पाने ‘बाहुबली’साठी माफी का मागितली?’ 
........................

कटप्पाची बहादुरी दाखवणारा ‘बाहुबली’चा दुसरा भाग या आठवड्यात पडद्यावर येणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याही भागावर मोठा खर्च झाला आहे आणि तो वसूल व्हायचा असेल, तर तो सगळीकडे धूमधडाक्यात प्रदर्शित होणे आवश्यक आहे. मार्केटिंगचे सध्याचे तंत्रच आहे ते. परंतु कटप्पा ऊर्फ सत्यराज यांचा भूतकाळ त्यांना छळायला आला अन् ‘बाहुबली’च्या संभाव्य यशापूर्वीच माशी शिंकली. 

सत्यराज हे ज्येष्ठ तमीळ अभिनेते. ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारख्या एखाद्या चुकार हिंदी चित्रपटात केलेल्या कामाचा अपवाद वगळता तमीळ चित्रपटांत त्यांनी संपूर्ण हयात घालवलेली. तमिळ परंपरेनुसार ते मूळ राजकीय कार्यकर्ते आणि त्या राजकारणासाठी उपयोगी व्हावे म्हणून बनलेले नट. द्रविड राजकारणाचे ते खंदे समर्थक, विशेषत: द्रमुक पक्षाशी त्यांचा जास्त घरोबा. याच कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी पेरियार यांच्यावरील चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. त्यांच्या या सक्रियतेमुळेच तमिळनाडूतील राजकीय पेचप्रसंगाच्या वेळेस कमल हसनने त्यांचे नाव घेऊन त्यांना छेडले होते. दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यामध्ये धूमशान चालू होते, तेव्हा कमल हसन यांनी ट्विटरवरून जोरदार आघाडी उघडली होती. ‘एरव्ही पेरियार, पेरियार असे तोंडाने म्हणता मग आता तुम्ही स्पष्ट भूमिका का घेत नाही,’ असा सवाल त्या वेळी कमल हसनने विचारला होता. सत्यराज यांनी तो वाद वाढवला नाही. परंतु राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याएवढा त्यांचा अधिकार आहे, हे त्यातून स्पष्ट झाले होते.   

सांगायचे म्हणजे विविध आंदोलनांमध्ये सत्यराज यांचा पुढाकार असतो. खरे म्हणजे ते अभिनेते-कम-राजकारणी होत. यात ‘कम’ हा इंग्रजी अर्थाने नव्हे, तर भारतीय अर्थाने घ्यायचा. त्यात तमिळनाडूत गेली तीन दशके गाजत असलेले आंदोलन म्हणजे कावेरी नदीच्या पाणीवाटपाचे. या कावेरीच्या दोन काठांवरील कर्नाटक आणि  तमिळनाडू ही दोन राज्ये एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहतात. दोन्हीकडच्या राजकारण्यांची ही रोजगार हमी योजना आहे. अन् नेत्यांनी शड्डू ठोकला, की आपद्धर्म म्हणून अभिनेत्यांना त्यात उतरावे लागते. रजनीकांतसारख्या सुपरस्टारलाही यातून सूट मिळत नाही. जयललिता आणि रजनीकांत यांच्यातील सख्य सर्वश्रुत आहे; मात्र जयललितांनी कावेरीच्या जाण्यासाठी उपोषण सुरू केले, तेव्हा आधी त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर करून सुपरस्टार मोकळा झाला! 

जिथे राजकारणापासून दोन हात दूर राहणाऱ्या हिरोंची ही गत, तिथे राजकीय कार्यात हिरीरीने उतरणाऱ्या नटांची स्थिती काय असावी? सत्यराज यांच्या बाबतीत हेच घडले. नऊ वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग उद्भवला होता. त्या वेळी सत्यराज यांनी केलेले वक्तव्य ‘बाहुबली’च्या मार्गातील धोंड बनले होते. त्या वेळी कावेरीच्या पाण्यासाठी तमिळनाडूतील शेतकरी आंदोलन करत होते. तिथे भाषण करताना सत्यराज यांनी त्यांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले होते. ‘कोणतेही कुत्रे येऊन लघुशंका करेल अशा एखाद्या झाडासारखे निष्क्रिय उभे राहू नका,’ असे वाक्य त्यांनी वापरले होते. तीच दृश्यफीत या निमित्ताने पुन्हा चलनात आली. 

सत्यराज यांनी कन्नड लोकांसाठीच कुत्र्याची उपमा वापरली होती, असा कन्नडिगांचा आक्षेप होता. सत्यराज यांनी माफी मागेपर्यंत ‘बाहुबली-२’ कर्नाटकात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकीच ‘कन्नड ओक्कूट’ या छत्राखाली एकत्र आलेल्या कन्नड संघटनांनी दिली होती. आता कन्नड संघटनांचीच धमकी ती, मग ती गांभीर्यानेच घ्यायला हवी. चित्रपटाचा दिग्दर्शक राजमौली याने या संघटनांना विनंती करून पाहिली. परंतु त्याचा परिणाम झाला नाही. 

चित्रपटातील कटप्पा भले सिंहासनाचा गुलाम असेल. परंतु प्रत्यक्षातील सत्यराज हा व्यवसायाशी बांधील आहे. कधीकाळच्या त्याच्या वक्तव्यामुळे १००-१५० कोटी रुपयांचा जुगार उलटणे त्याला परवडणारे नव्हते. त्यामुळे आपल्या निर्मात्याचे नुकसान होऊ नये, यासाठी त्याला माफी मागणे भाग होते. म्हणूनच ‘बाहुबली’साठी क्षमायाचना करणे त्याला क्रमप्राप्त होते.

एकूणच प्रकरण उग्र स्वरूप धारण करत आहे, हे पाहून सत्यराज यांनी एक व्हिडिओ प्रसृत केला. यात ते कर्नाटकातील लोकांची माफी मागताना दिसतात; मात्र ही माफी मागतानाही सत्यराज यांनी आपला बाणा दाखवून दिला आहे. ‘अभिनेता म्हणून ओळखला जाण्यापेक्षा तमिळन (तमिळ व्यक्ती) म्हणून ओळखले जाण्यात मला जास्त अभिमान आहे. तमिळन म्हणून मरायला मला आवडेल,’ असे सत्यराज यांनी या चित्रफितीत म्हटले आहे. वर ‘तमिळनाडूशी संबंधित सर्व विषयांवर मी बोलत राहीन,’ असेही ठासून सांगितले आहे.

इतकेच नाही, तर ‘यापुढे मला घेताना निर्मात्यांनी चारदा विचार करावा,’ असेही त्यांनी सांगून टाकले आहे. यातून आपल्याकडच्या विद्वानांनी बोध घेतला तर बरे होईल. दक्षिणेतील नट-नट्या राजकारणात प्रवेश करतात आणि त्यामुळे राजकारणाचा दर्जा घसरतो, असा या लोकांचा दावा असतो. परंतु सत्यराज यांच्यासारखे एखादे उदाहरण पुढे येते आणि त्या विधानाची पुन्हा तपासणी करावी लागते. हे लोक आधी राजकारणी, आधी कार्यकर्ते आहेत आणि मग कलावंत. मग ते सत्यराज असोत, शरदकुमार असोत किंवा थेट एमजीआर-जयललिता असोत.  

त्यामुळेच कटप्पाने ‘बाहुबली’साठी भलेही माफी मागितली असेल; पण स्वतःची शानही कायम ठेवली आहे. आता हे प्रकरण पुढे कसे उलगडते, हे ‘बाहुबली’एवढेच रंगणार हे नक्की!

- देविदास देशपांडे

ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com 

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZGBBB
Similar Posts
हा ‘बाहुबली’ येतो तरी कुठून? ‘बाहुबली’ पाहून त्याचे कौतुक करावेच; मात्र ते पाहताना त्याच्या मागची संस्कृतीही पाहायलाच हवी. ती कळल्याशिवाय ‘बाहुबली’ येतो कुठून हे कळणार नाही आणि ते कळल्याशिवाय नवा ‘बाहुबली’ निर्माण होणे नाही!
हुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या शिफारशीनंतर हिंदी भाषेच्या विरोधातील सूर उमटला आणि जणू सगळ्याच दाक्षिणात्यांच्या भावना उफाळून आल्याचे भासवले गेले. ‘तमिळ लोक म्हणजे हिंदीविरोधी, त्यांची भाषिक अस्मिता हाच आदर्श आणि मराठी लोकांनी त्यांचा कित्ता गिरवावा,’
बाहुबली सोडा, डोरेमॉन बनवतो पाकिस्तान्यांना भारतीय! भारतीय साहित्यावर आधारलेल्या, भारतीय भाषांत असलेल्या अॅनिमेटेड मालिकांनी पाकिस्तानी बालकांच्या मनांवर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे! वेगवेगळी बंधने घालून कुंद केलेल्या पाकिस्तानी समाजात कल्पनाशक्ती कुठून येणार आणि येथे तर कल्पनांचा वारू मोकाट सुटलेला! म्हणूनच फक्त भारतीयच नाही, तर ‘हिंदी भाषेत डब
त्रिभाषा सूत्राचा श्रेष्ठ मंत्र ‘शिक्षणाच्या बाबतीत सर्व राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारायला हवे आणि विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याची संधीही उपलब्ध करून द्यायला हवी. हिंदी ही संपर्क भाषा आहे, इंग्लिशला आपल्या व्यवस्थेपासून दूर ठेवता येत नाही आणि प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतूनच प्रभावीपणे देता येते,’ असे ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष जी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language